नाशिक। दि. २७ जुलै २०२५: पूर्ववैमनस्यातून फुलेनगर परिसरातील विजय चौकात बुधवारी (दि.२३) मध्यरात्री झालेल्या गोळीबार व दगडफेक प्रकरणी दोन विधिसंघर्षित बालकांसह जय संतोष खरात (वय: २३) यास पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली. खरात हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो हद्दपार असताना गोळीबार प्रकरणात सहभागी झाला.
दोन दिवसांपूर्वी टोळी युद्धातून गोळीबार झाला होता. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले होते. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यावरून संशयितांवर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना माहिती मिळाली की, सदर संशयित आरोपी हा फुले नगर परिसरात येणार आहे. त्याप्रमाणे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात सहभागी दोन विधीसंघर्षित बालकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.