नाशिक। दि. २४ जून २०२५: विवाह संकेतस्थळावर विवाहेच्छुक महिलेशी संपर्क साधून तिला लग्नाचे अमिष दिले. शहरात येऊन हॉटेल व लॉजवर भेटण्यास नेत शारीरिक संबंध ठेवत, लग्नाकरीता पैसे आणि कार, बुलेट घेवून लग्नास नकार देत फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. मुंबईनाका पोलिसांनी पनवेल आणि खामगाव रायगड येथे ही कारवाई केली. मुस्तफा मेहबूब जोगीलकर आणि त्याचे वडील मेहबूब उमरसाहब जोगीलकर अशी या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ८ जानेवारी ते १५ मे २०२५ या कालावधीत शहरात राहणाऱ्या महिलेशी एका विवाह संकेतस्थळावरून ओळख करत लग्न करण्याचा प्रस्ताव दिला. महिलेने संशयिताला कुटुंबियांना भेटण्यास सांगितले. संशयित मुस्तफा नाशिकला एकटाच आला. लग्न करण्याचे अश्वासन दिले.
भेटण्यास नेत हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले. लग्नाकरीता पैशांची गरज असल्याचे सांगत पैशांची मागणी केली. तसेच मी येथे कार बुक केली आहे असे सांगितले. बुलेटची आवड असल्याचे सांगितले. पीडितेने भावाच्या नावावर कर्ज काढून कार आणि बुलेट घेऊन दिली. संशयिताचे वडील मेहबूब यांनी घरी येऊन लग्न ठरवले. एप्रिलमध्ये लग्न ठरले होते. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी लॉन्स बुक केला होता. लग्नाच्या दिवशी संशयित आला नाही.
ऑनलाइन संपर्क केलेल्या तरुणी आणि महिलांच्या कुटुंबीयांशी लग्नाची बोलणी करण्यासाठी संशयित त्याचे वडील महेबूब उमरसाहब जोगीलकर यांना घेऊन जात असे. वडील स्वतः बोलणी करण्यासाठी आल्याने तरुणींच्या कुटुंबीयांना त्यांचा विश्वास वाटत असे. त्याची संधी साधत दोघे त्यांची फसवणूक करीत होते.
पथकाने मुस्तफाला पनवेल, नवी मुंबई येथून तर मेहबूब यास खामगाव, रायगड येथून अटक केली. सहायक निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790