नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी परिसरात गेल्या चार महिन्यांत घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. निमाणी बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आलेल्या या संशयिताकडून दोन लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस चौकशीतून आणखी गुन्हे उकल होण्याची शक्यता आहे.
अस्लम अतिफ शेख असे अटक करण्यात आलेल्या अट्टल घरफोड्या संशयिताचे नाव आहे. पंचवटी परिसरात सातत्याने घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना करीत गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सांगितले होते. दरम्यान, पोलिस अंमलदार संदीप मालसाने यांना संशयित अस्लम हा निमाणी बसस्थानक परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि अस्लम यास अटक केली. पोलिस चौकशीतून त्याने तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे. त्याने साथीदार पोपट शंकर कणिंगध्वज याच्या मदतीने गेल्या चार महिन्यांत केल्याची कबुली दिली आहे.
त्याच्याकडून तीन घरफोड्यांतून चोरलेले सात तोळे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल, असा दोन लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हवालदार दीपक नाईक गुन्ह्याचा तपास करीत आहेत.संबंधित कामगिरी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, सागर कुलकर्णी, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, कैलास शिंदे, संदीप मालसाने, नीलेश भोईर, राकेश शिंदे, अंकुश काळे यांच्या पथकाने बजावली आहे.