
नाशिक, दि. 20 मे 2025: इंदिरानगर परिसरात कारची काच फोडून रोख रक्कम लांबवणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने तीन सराईत चोरांना अटक केली आहे. पोलिसांनी तब्बल ५,५९,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत दोन गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
दिनांक १३ मे २०२५ रोजी इंदिरानगरमधील चेतनानगर भागात पार्क केलेल्या क्रेटा कारची काच फोडून अज्ञात आरोपींनी १.५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी नाशिक ते मालेगावदरम्यान सुमारे ९० किमी परिसरातील फुटेज तपासले. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून ते ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घोडबंदर येथे दोन दिवसांची मोहिम राबवून खालील तिघांना अटक केली:
- सॅम्युअल हरेल परेरा (५७) – पुराणिक सिटी, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम
- हरीश उर्फ अजय रवि गुडेटी (३५) – नेल्लोर, आंध्रप्रदेश
- अभिजीत गणेश प्रसाद (३०) – ठुकाईनगर, दौंड, पुणे
आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली इको कार, आणि होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण ५,८९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान उघडकीस आले की, वापरण्यात आलेली मोटारसायकल देखील चोरीची असून तिच्याबाबत आंध्रप्रदेशमधील बोबली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सॅम्युअल हरेल परेरा हा एक रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्रात त्याच्यावर बॅग लिफ्टिंग व चोरीचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट-२ चे डॉ. समाधान हिरे, यशवंत बेंडकोळी, बाळु शेळके, संजय सानप, प्रकाश महाजन आणि सुनिल खैरनार यांनी संयुक्तपणे पार पाडली.