
नाशिक। दि. १६ जून २०२५: एम.डी. (मेफेड्रॉन) या प्रतिबंधित अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण ८.५ ग्रॅम वजनाची एम.डी. पावडर आणि इतर साहित्य मिळून २ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संबंधित कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नाशिक शहरात अमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनांनुसार ही यशस्वी कारवाई झाली.
गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलिस उप निरीक्षक गुलाब सोनार यांना माहिती मिळाली, की दोन व्यक्ती रिक्षामधून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी मानूर रस्त्यावर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना अडवले. चौकशीत त्यांची नावे संशयित: सुमीत अशोक धाईंजे (वय २७, रा. लोखंडे मळा, उपनगर) आणि शाकीर हसन सय्यद (वय ३२, रा. वडाळागाव) अशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ८.५ ग्रॅम एम.डी. पावडर (सुमारे ४२ हजार ५००), १.५० लाखांची रिक्षा, २० हजारांचे मोबाईल फोन असे मिळून दोन लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.
संबंधित कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी केली.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790