नाशिक: शेतीमाल चोरणारे दोघे जेरबंद, १० लाखांचा माल जप्त !

नाशिक। दि. १४ जून २०२५: शेतकऱ्यांच्या शेतातून शेतीमाल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना म्हसरुळ पोलिसांनी दिंडोरीरोडवर मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ पिकअप वाहने, सोयाबीन, गहू आणि तांदूळ असा एकूण १० लाख ८७ हजार रुपयांचा शेतीमाल व वाहने जप्त केली आहेत. योगेश धोंडीराम गांगुर्डे (रा. मडकीजांब) आणि पप्पू उर्फ रवींद्र बाळू मोरे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरुळ परिसरातील आडगाव लिंकरोडवरील पगारे वस्तीतून इंद्रायणी तांदळाचे ४० पोते चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलिस पथकातील राकेश शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, संशयित गांगुर्डे आपल्या साथीदारासह पिकअप (एमएच ११ टी ३३५४) वाहनाने दिंडोरीरोडने येत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. संशयितांची पिकअप दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला, परंतु तो थांबला नाही. पोलिसांनी पाठलाग करून पिकअपला अडवले आणि दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी म्हसरुळ परिसरात गहू आणि तांदूळ चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, तपासात त्यांनी लासलगाव आणि तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही शेतीमाल चोरल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण, दीपक पठारे, बाळासाहेब मुर्तडक आदींच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790