नाशिक। दि. १० सप्टेंबर २०२५: दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना उपनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी दुचाकी चोर काका-पुतण्यांना शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
वडनेरदुमाला भागातून चोरी केलेल्या दुचाकीचा तपास करत असताना एका संशयास्पदरित्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शोध पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीमध्ये मिळालेल्या धक्कादायक माहितीवरुन काकाने त्याला हाताशी धरून नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून तसेच घोटी, इगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनदेखील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या आदेशान्वये गुन्हे शोधपथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, प्रशांत देवरे, पंकज कर्पे आदींनी वडनेर दुमाला परिसरात सापळा रचला. संशयित सलिम हुसेन पठाण (रा. गोंदेगाव) यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
त्याने नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच घोटी, इगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.
![]()

