नाशिक शहरात एलपीजी गॅसचा मोठा काळाबाजार उघड; ४६ सिलिंडर जप्त, चौघांना अटक

नाशिक | दि. ८ एप्रिल २०२६: घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीररीत्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्या टोळीचा नाशिक गुन्हे शाखा युनिट क्र. १ आणि भद्रकाली पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संशयित संदीप संतोष चव्हाण (२८), आसिफ अहमद शेख (३६), अनिल लहू घोडे (२९) आणि अशोक पटेकर (२८) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून ३३ घरगुती सिलिंडर, १३ व्यावसायिक सिलिंडर, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे तसेच एक मालवाहू वाहन असा एकूण ३ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: माडसांगवीत कोयता घेऊन दहशत माजवणारा जेरबंद

भद्रकाली परिसरातील कुट्टी बाजार येथे पत्र्याच्या शेडमध्ये हे बेकायदेशीर काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घरगुती सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून अधिक दराने विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असताना नागरिकांना घरगुती सिलिंडर मिळवण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत काही जण साठेबाजी करून त्याचा गैरफायदा घेत असल्याचेही समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ च्या लक्षित गट परिवार सर्वेक्षणाचे जिल्ह्यात आयोजन

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे साध्या वेशात छापा टाकला.

छाप्यादरम्यान आरोपी घरगुती सिलिंडरमधून विशेष उपकरणांच्या सहाय्याने गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरताना रंगेहाथ सापडले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रविण वाघमारे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, विशाल काठे, अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार सतीश साळुंके, कयुम अली सैयद, अविनाश जुंदरे, प्रभाकर आहेर, पोअं/सागर निकुंभ, निलेश विखे, अविनाश थेटे यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790