
नाशिक। दि. ३ डिसेंबर २०२५: नांदुर नाका परिसरात निमसेविरुद्ध धोत्रे टोळीमध्ये किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात राहुल धोत्रे हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह टोळीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात ऑगस्टपासून फरार असलेले संशयित आरोपी भूपेश उर्फ बाळा गायकवाड (वय २३), हेमराज गायकवाड (२४, रा.पंचक) यांना गुंडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांकडून संशयित पाहिजे आरोपींची अद्यापही धरपकड सुरू आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी मध्यवर्ती कारागृहात आहेत. गायकवाड बंधू हे गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते, तेव्हापासून पोलिस त्यांचा माग काढत होते. मात्र, आपले अस्तित्व लपवून ते गुंगारा देण्यास यशस्वी होत होते.
गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने देवळाली कॅम्प गाठले. येथील विजयनगर भागात दोघे भाऊ वास्तव्य करत असल्याची माहिती समजताच, परिसरात साध्या वेशात पथकाने सापळा रचला. हे दोघे बाहेर पडताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पुढील तपासाकरिता आडगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
![]()


