
नाशिक। दि. ३ ऑक्टोबर २०२५: कॅफेमध्ये खून करणाऱ्या जी. एस. कंपनीच्या वारसी टोळीचा फरार म्होरक्या गयासोद्दीन उर्फ गॅस आणि हासीम वारसी या दोघा भावांना आर्थिक मदत आणि पळून जाण्याकरीता त्यांचे अस्तित्व लपवून ठेवण्यास मदत करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने राणाप्रचाप चौक, सिडको येथे ही कारवाई केली. किस्तम अली आजम अली अन्सारी असे या संशयिताचे नाव आहे.
वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाचे नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी यांना माहिती मिळाली. वारसी टोळीचा प्रमुख गयासोद्दीन याला बांधकाम व्यावसायिकाने पळवून लावण्यास आणि आर्थिक मदत केल्याची माहिती मिळाली.
तो राणाप्रताप चौकात असल्याचे समजले. पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत मदत केल्याची कबुली दिली. संशयित वारसी टोळीला मदत करत असल्याचे तपासात निष्पन्ना झाले. संशयिताला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघे वारसी बंधू फरार आहेत. या संशयितांच्या मागावर इंदिरानगर डीबी पथकासह गुन्हे शाखेचे पथक आहे. व्यावसायिकाची अधिक चौकशी सुरू आहे.
![]()

