नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. वेदांत संजय चाळगे (१९, रा. राहुलनगर, तिडके कॉलनी, वेद मंदिरामागे, नाशिक) असे तडीपार गुंडाचे नाव आहे.
शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार महेश खांडबहाले यांना तडीपार गुंड शहरात विनापरवानगी वावरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने चांडक सर्कलकडून जलतरण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शासकीय इमारतीसमोर ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, राजेंद्र घुमरे, मनोहर शिंदे, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, सामेनाथ जाधव यांच्या पथकाने बजावली.