नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): एमडी विक्री करण्यासाठी आलेल्या दोन युवकांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रविवार कारंजा येथे अटक केली आहे.
रविवार कारंजा येथे एमडी विक्री करण्यासाठी दोन युवक येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे बुधवारी (दि. १९ जून) वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे आणि सहायक पोलीस निरीक्षक नागरे यांच्या पथकाने सापळा रचला.
बुधवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास रविवार कारंजाकडून रेड क्रॉस सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर या दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. धीरज धनराज चांदनानी (वय: २४, राहणार: एमजी रोड, नाशिक) आणि रोहित सुनील अहिरराव (वय: २७, राहणार: सुयश अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, शांतीनगर, मखमलाबाद शिवार) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३२ ग्रॅम वजनाची तब्बल १ लाख ६० हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७३/२०२४)