नाशिक: आयसीआयसीआय होम फायनान्स लूट प्रकरणी एकाला गुजरातहून अटक !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेतील पाच कोटींच्या सोने चोरून नेल्याप्रकरणात शहर गुन्हेशाखेने एका संशयिताला गुजरातमधून अटक केली आहे. तर दुसरा पोलिसांच्या हातातून निसटण्यात यशस्वी झाला आहे. दीड महिन्यापूर्वी सदरची घटना घडली असून, २२२ ग्राहकांचे ५ कोटींचे सोने संशयितांनी चोरून नेले होते. मात्र पोलिसांना यात फक्त ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेतील लॉकरमधून २२२ ग्राहकांचे सुमारे ५ कोटींचे सोने संशयितांनी चोरून नेल्याची घटना ४ मे रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. या घटनेला दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरीही गुन्ह्यातील संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते. शहर पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर परराज्यात होती. यातील एका पथकाला संशयित परराज्यातील देवदर्शन करून गुजरातमध्ये गेल्याचे समजले. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने गुजरात गाठत, हलोल शहरात संशयितांची शोध मोहीम सुरू केली.

त्यावेळी सोमवारी (ता. १७) संशयित स्वीफ्ट कारमधून (एमएच १२ एचव्ही ०८१८) जाताना दिसले. पथकाला संशय आल्याने त्यांनी कारचा १० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. ज्या रस्त्याने संशयित जात होते, तो रस्ता पुढे बंद झाल्याने संशयितांनी कार सोडून जंगलाकडे पळ काढला. पथकाने त्यांचा पाठलाग केला असता, संशयित सतिश चौधरी (२७, रा. महाराणा प्रताप चौक, सिडको) यास अटक करण्यात आली तर त्याचा साथीदार रतन जाधव मात्र पोलिसांच्या हातातून निसटण्यात यशस्वी झाला आहे.

याप्रकरणात आत्तापर्यंत तुकाराम देवराम गोवर्धने (रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यास अटक केली आहे. या गुन्ह्यात कट रचणारा मुख्य संशयित वैभव लहामगे हा नाशिक ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात आहे. पहिलवान भूषण लहामगे याच्या खूनप्रकरणात अटक आहे. रतन जाधव व सतिश चौधरी यांचाही भूषण लहामगे खूनात समावेश होता. मात्र त्यानंतर ते पसार झाले होते. यातील सतिश चौधरीला अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790