धुळ्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा: त्र्यंबकच्या लॉजचा मुद्दा ऐरणीवर
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील लॉजिंगचे व्यवसाय संशयाच्या भोवऱ्यात असतानाच एका अल्पवयीन मुलीला त्र्यंबकरोड परिसरातील लॉजमध्ये नेत बलात्कार करण्यासह तिचे फोटो नातेवाइकांना पाठवत तिची बदनामी केल्याप्रकरणी धुळ्यातील युवकावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत आक्षेपार्ह अवस्थेतील पीडितेचे मोबाइलमध्ये फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. यासाठी आरोपीने अल्पवयीन पीडितेला त्र्यंबकेश्वर येथील लॉजवर नेत अत्याचार केला. त्यानंतर तिच्यासमवेतचे फोटो तिच्या नातलगांच्या सोशल मीडियावर टाकून बदनामी केली.
■ पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने १८ एप्रिल रोजी त्र्यंबकमधील धनश्री हॉटेल व लॉजिंगमध्ये सदरचा प्रकार केला व पीडितेचे अश्लील फोटो तिच्या नातलगांना व्हॉट्सअॅप, इन्स्ट्राग्रामला पाठविले. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला उपनिरीक्षक महाजन या तपास करीत आहेत.
■ गुन्हा त्र्यंबकेश्वर हद्दीत घडल्याने तो सरकारवाडा हद्दीतून त्र्यंबक पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. यानिमित्ताने लॉजचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी संशयित हरी ऊर्फ दीपक विठ्ठल कोरडकर (२०, रा. रायपूर, ता. साक्री, जि. धुळे) याच्याविरोधात पोक्सो व बलात्कारासह विविध कलमांन्वये सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सरकारवाडा पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्ट्रर क्रमांक: १५४/२०२४)