नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यास हॉस्पिटल ओनर असोसिएशनने नकार देत याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. दरम्यान अशा पद्धतीने रुग्णसेवा एकतर्फी बंद केली तर कारवाई करू असे नाशिक मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले आहे.
हॉस्पिटल ओनर असोसिएशनने मंगळवारी (दि. १ जून) मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठविले आहे. यात म्हंटले आहे की, आपण गेल्या दीड वर्षापासून कोविड या साथीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शासकीय स्तरावरून आपण केलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आम्ही सर्व नाशिक मधील खाजगी रुग्णालयात सेवा दिली. मृ’त्युदर कमी राखण्यात आणि रुग्ण बरे होण्यात आपल्या सर्वांचे योगदान आहे हे आपण मान्य करालच.
परंतु आम्हा सर्वाना काही समस्या आहेत. आम्ही सर्वजण आणि आमचा कर्मचारी वर्ग आता मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या थकलो आहोत. तसेच आता कोविड रुग्णसंख्या कमी झाली आहे. तेवढे रुग्ण सांभाळणे शासकीय आणि निमशासकीय आरोग्य यंत्रणांना सहज शक्य आहे. कारण त्यासुद्धा तेवढ्याच दर्जेदार आहेत. त्यामुळे आम्ही सर्व खाजगी कोविड रुग्णालये आता सदर सेवा बंद करत आहोत. भविष्यात जर पुन्हा गरज पडली तर आम्ही सर्वजण सेवा देऊ. कृपया आम्हाला या जबाबदारीतून मुक्त करावे ही विनंती असे म्हंटले होते.
यावर आता नाशिक मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा लागू आहे. अशा परिस्थितीत कोविड सेवा बंद करण्याचा एकतर्फी निर्णय हॉस्पिटल ओनर असोसिएशनला घेता येणार नाही. कोविड सेवेसंदर्भात हॉस्पिटल ओनर असोसिएशनचे काय म्हणणे आहे. ते जाणून घेण्यात येईल. तोपर्यंत त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. रुग्णांची गैरसोय झाल्यास त्याची जबाबदारी खासगी रुग्णालयांवर येऊ शकते. त्यामुळे रुग्णसेवा एकतर्फी बंद केली तर आम्ही कारवाई करू.
याशिवाय आता कोरोना रुग्णालयांची उलट तपासणी होणार आहे. दुसऱ्या लाटेत ९० खासगी कोविड रुग्णालयांची संख्या १८८ वर पोहोचली. यात, काही रुग्णालयांकडून आर्थिक लुटीच्या तक्रारी असल्यामुळे पालिकेच्या लेखापरीक्षकांनी त्यांची उलटतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात लेखापरीक्षण विभागाने दहा खासगी रुग्णालयांकडून मार्चपासून किती बिले झाली याची माहिती मागवली आहे. वैद्यकीय विभागाने कोविड सेंटरमधील ऑक्सिजन वापर, औ ष ध पुरवठा तसेच अन्य सुविधांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची सुविधा आहे का? ऑक्सिजन पुरवठादारासमवेत संबंधित रुग्णालयाने करार केला आहे का? रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचारी वर्ग पुरेसा आहे का, याचीदेखील तपासणी आता केली जाणार आहे.