नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): २४ गुंतवणूकदारांना कमी रकमेत फ्लॅट देण्याचे प्रलोभन दाखवून सुमारे ३ कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक एका बांधकाम व्यावसायिकांसह साथीदारांकडून त्याच्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मौर्या हाइट्सच्या नावाने पत्रके छापून कमी रकमेत १बीएचके फर्निश्ड फ्लॅट स्टॅम्प ड्यूटीज, रजिस्ट्रेशन फी जीएसटीसह, लीगल फी व सर्व खर्चासहित मॉड्यूलर किचन आदी सुविधांचे प्रलोभन दाखविले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ लाख ६७ हजार रुपयांची सबसिडी आणि रेरा अॅप्रूव अशी जाहिरातबाजी करत फिर्यादीकडून ११ लाख ७० हजार रुपयांची रक्कम घेतली. इतर गुंतवणूकदारांकडून वेगवेगळ्याप्रकारे अंदाजे एकूण ३ कोटी २६ लाख रुपयांची रक्कम घेत संशयित बिल्डर कुणाल प्रकाश घायाळ (रा. पाइपलाइन रोड, गंगापूररोड) यांनी फसवणूक केल्याने फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी अमोल भरत भागवत (२९, रा. त्रिमूर्ती चौक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २०१३ सालापासून भागवत यांच्यासह अन्य २४ गुंतवणूकदारांकडून २०२१ सालापर्यंत संशयित कुणाल व त्याच्या इतर साथीदारांनी रक्कम उकळली. ऑफिस थाटल्याचे भासवून ३ कोटी २६ लाख रुपयांची माया जमविल्यानंतर शहरातून गाशा गुंडाळल्याचे तपासात आहेर आले आहे.
खरेदी-विक्रीचे दिले बनावट दस्तऐवज:
संशयित कुणाल याने के. के. डेव्हलपर्स व अंश प्रॉपर्टीज् या नावाने विसे मळा, कॉलेजरोड येथे स्वतःचे मोठे ऑफिस असल्याचा देखावा निर्माण करत लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून रक्कम गोळा करत करारनामा, साठेखत, नोटरी जनरल मुखत्यारपत्र असे वेगवेगळे प्रॉपर्टी खरेदीचे दस्तऐवजसुद्धा हाती दिले; मात्र गृहप्रकल्पाचे बांधकाम अर्धवट ठेवून दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा सोपविला नाही आणि स्वीकारलेल्या रकमेत अफरातफर करत रक्कम परत न करता पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.