नाशिक (प्रतिनिधी): क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सात सायबर भामट्यांनी एका महिलेसह ३६ जणांची ८१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की २३ वर्षीय फिर्यादी महिला ही नवीन सिडकोतील पवननगर परिसरात राहते. संशयित आरोपी प्रसाद तडाखे, पवन उबाळे, समर्थ जगताप (सर्व रा. नाशिक), खुशाल पवार व ओरिस कॉईन क्रिप्टो करन्सीचे भारतातील संचालक, संशयित राहुल खुराणा, अविनाश सिंग व रहव ठाकूर (सर्वांचे पूर्ण पत्ते माहीत नाहीत) यांनी संगनमत करून ओरिस क्रिप्टो करन्सी कंपनीचे भारतातील संचालक असल्याचे भासविले. त्यानंतर ओरिस कॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये १ लाख ४० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा पाच हजार रुपये डिव्हिडंड, तसेच आणखी लोक जॉईन केल्यास त्याचे कमिशन व कॅम्प मॅक्स येथे ट्रिप मिळेल, तसेच इतर लाभमिळतील. त्याचप्रमाणे करन्सी ओरिस कॉईनचे रेट जसे वाढतील, तसेच तुमचे पैसेही वाढतील, असेही सांगितले.
फिर्यादी महिलेचा आरोपींनी विश्वास संपादन करून त्यांना १ लाख ४० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीच्या भावानेही १ लाख १४ हजार रुपये व फिर्यादी यांच्या ओळखीचे एकूण ३६ गुंतवणूकदार यांच्याकडून ७८ लाख ८८ हजार रुपये अशी एकूण ८१ लाख १६ हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर व रोख स्वरूपात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतविलेल्या रकमेचा परतावा न देता या रकमेचा अपहार करून फिर्यादीसह त्यांचे भाऊ व इतर ३६ जणांची फसवणूक केली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७/२०२५)