नाशिक। ६ एप्रिल २०२५: शहरातील वाढत्या सावकारीच्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई सुरु करण्यात आली असून शनिवारी दहापेक्षा जास्त सावकारांच्या घरांवर पोलिस आणि सहकार विभागाच्या संयुक्त पथकांनी छापे टाकले. त्यातील ८ सावकारांच्या घरातून ४२ लाख ८१ हजार रुपये रोख, कोट्यावधी रुपये मूल्यांचे १७९ जमिनीचे करारनामे, एमएओयू, खरेदीखत, तसेच २०८ कोरे धनादेश अशी कागदपत्रे जप्त करण्यात आली.
या कारवाईत माजी नगरसेवक, आमदाराचे निकटवर्तीयांसह राजकीय पदाधिकाऱ्यांच्या समावेश आहे. सावकारीविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली राज्यातील ही पहिलीच कारवाई ठरल्याचा दावा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आला.
⚡ या सावकारांच्या घरावर छापे -आणि जप्त झालेली मालमत्ता
👉 माजी नगरसेवक नैया खैरे: 12 करार, 19 धनादेश, (२१ लाख ५० हजार रोकड)
👉 संजय शिंदे: ८१ कोरे चेक, ४० खरेदीखत, ६ लेजर बुक, ४ डायऱ्या (३ लाख २० हजारांची रोकड, १ पैसे मोजण्याचे यंत्र)
👉 प्रकाश आहिरे: २३ नोंदणीची कागदपत्र, ४ लाख ५० हजारांची रोकड, अमेरिकन डॉलर्स (भारतीय मूल्य ७लाख ५० हजार)
👉 सुनिल पिंपळे: ११ खरेदीखत, २ साठेखत, १ कब्जा पावती, ५ कोरे स्टॅम्प, २४ कोरे धनादेश, २ हात उसननवार पावत्या (४ लाख ८ हजारांची रोकड)
👉 गोकुळ धाडा: ५० उसनवार पावत्या, (२ खरेदीखत, ७० कोरे धनादेश)
👉 धनू लोखंडे: ५० खरेदीखत (१२ कोरे धनादेश)
👉 राजेंद्र जाधव: २ डायऱ्या (२ लाख ३ हजार रोकड)
👉 कैलास मैंद: २ कोरे धनादेश, १ एमओयू, ९ खरेदीखत.
याव्यतिरिक्त गुरुदेव कांदे, जुबेर पठाण, कैलास मुदलियार, सचिन मोरे आणि रोहित चांडोळे यांच्याही घरी झडती घेतली गेली. मात्र ते अवैध सावकारी करत असल्याचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही.
अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्ती कर्जदारांकडून मुद्दलापेक्षा अधिक व्याजासह रक्कम बळजबरीने घेत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. वैभव देवरे, रोहित कुंडलवाल या सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर शहरातील सावकारी चर्चेत आल्याने ‘पोलिस आयुक्त आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत काही नागरिकांनी सावकारांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यांची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहकार विभागाचे उपनिबंधक फय्याज मुलाणी यांच्याकडून प्राप्त तक्रारींची माहिती मागवली होती. त्यात शहरातील १७ सावकारांची नावे समोर आल्याने त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. त्यात पुरावे आढळून आलेल्या ८ जणांविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध सावकारी करणाऱ्यांची माहिती अथवा तक्रार असल्यास थेट पोलिस आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा अथवा पोलिसांच्या व्हॉट्सअॅप सीपी क्रमांकाच्या हेल्पलाइन, पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क करून माहिती द्यावी. अवैध सावकारी करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
– संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक
![]()


