नाशिक (प्रतिनिधी): धात्रकफाटा भागात भरधाव ऑटोरिक्षाने धडक दिल्याने ७१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाले. आत्माराम विश्वनाथ खरात (रा.शिक्षक कॉलनी,धात्रकफाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खरात गेल्या बुधवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. संदिप किराणा दुकाना समोर भरधाव येणा-या एमएच १५ एफयू ८३११ या ऑटोरिक्षाने दुचाकीस समोरून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
कुटुंबियांनी त्यांना तातडीने नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून शताब्दी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृर्तीत सुधारणा न झाल्याने अधिक उपचारार्थ त्यांना आडगाव मेडिकल कॉलेज येथे हलविले असता मंगळवारी (दि.२७) उपचार सुरू असतांना डॉ. शुभम मिसाळ यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.