नाशिक (प्रतिनिधी): सिटी लिंक बस खड्यात आदळून प्रवाशाच्या पोटाला जबर मार लागून प्रवाशाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी सिटी लिंक बसचालकाच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि माया माळी (रा. दिंडोरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. २) सकाळी ७.४५ वाजता सिटी लिंक बसने (बस क्र. एमएच १५, जीव्ही ८०३४) पती संतोष माळी यांच्यासोबत हिंगणवेढा प्रवास करत असताना हिंगणवेढा येथे बसचालकाने हयगयीने भरधाव वेगात बस चालवल्याने ही बस मोठ्या खड्यात आदळली.
यामुळे झटका बसल्याने माया माळी ह्या बसमध्ये खाली पडल्या तर पती संतोष माळी हे सिटच्या पाठीमागील भागावर पोटावर जोरात पडल्याने त्यांच्या पोटास गंभीर मार लागला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक मुरलीधर शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ७३/२०२४)