नाशिक (प्रतिनिधी): दुचाकी चालविताना तोल गेल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि.३) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अलका देवराज गुज्जर (३१, रा. बोरगड) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
अशोक स्तंभाकडून रामवाडीच्या दिशेने दुचाकीने (एम. एच १५ जे झेड ५२६१) प्रवास करताना आधाराश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांचा तोल गेला. यावेळी रस्त्याच्या उजव्या बाजूला कोसळल्याने पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून त्या चिरडल्या गेल्या. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तातडीने गंभीर जखमी अवस्थेत गुज्जर यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनास्थळावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ ट्रॅक्टर उभा करतो, असे सांगून चालक तेथून पसार झाला.
![]()


