नाशिक (प्रतिनिधी): भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाच्या मागे बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर संशयित रिक्षाचालक फरार झाला. मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर हा अपघात घडला.
मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश आडके (रा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी (दि. १९) रात्री ९.३० वाजता दुचाकीने त्यांचे सासरे शरद बाबुराव मेधने (६५, रा. चेतनानगर, राणेनगर) यांना घेऊन जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षाने दुचाकीला धडक दिली. यात धडक बसल्याने मेधने रस्त्यावर आपटले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १००/२०२५)