नाशिक (प्रतिनिधी): रखडलेल्या वेतनाची मागणी करत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर रविवारी (दि. ६) सांयकाळी मिटला.
बैठकीत जून महिन्याचे वेतन ९ ऑगस्टला तर जुलै महिन्याचे वेतन २२ ऑगस्टपर्यंत बोनससह देण्याचे तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे आयडी बंद आहेत ते तातडीने सुरू करण्याचे, कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिपसह जॉईंनिंगचे लेटर देण्याचे मान्य करण्यात आल्याने सोमवारपासून (दि. ७) सिटीलिंकच्या बसेस पुन्हा धावणार आहेत.
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे सिटीलिंकला मात्र ७५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.
सिटीलिंकच्या माध्यमातून रोज ७५ हजार प्रवासी व २० हजार विद्यार्थी प्रवास करतात. या प्रवाशांच्या माध्यमातून सिटीलिंकला रोज सरासरी २५ लाखांचे उत्पन्न प्राप्त होत असते. सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन वर्षात पाच वेळा संप पूकारण्यात आला आहे. वारंवार असे संप होत असल्याने याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये नेमका पगार किती याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.बैठकीत देखील याबाबत कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.याबाबत सिटीलिंकचे व्यवस्थापक बंड यांनी डेपो परिसरात याबाबत सविस्तर पत्रकच लावणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.