नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या सिटीलिंक बसच्या वाहकांचे संबंधित ठेकेदाराने मागील थकलेले वेतन मुदतीत न दिल्याने गुरुवारी (दि.१४) वाहकांनी पुन्हा संप पुकारला आहे. वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार यांचे हाल झाले होते. वाहकांनी वेतन मिळण्यासाठी घेतलेल्या आंदोलनात्मक पवित्र्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच नाशिक शहरात धावणारी सिटीलिंक बससेवा ठप्प पडली होती.
विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच वेतन मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या वाहकांनी संबंधित ठेकेदाराच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत बससेवेला ब्रेक लावला होता, वाहकांना वेतन मिळत नसल्याच्या कारणावरून एकूण आत्तापर्यंत पुकारलेल्या संपापैकी आजचा आठवा संप असल्याचे वाहकांनी सांगितले.
सिटीलिंक ठेकेदाराकडून यापूर्वी देखील वाहकांचे वेतन रोखले होते. त्यावेळी वाहकांनी संप मागे घ्यावा. पंधरा दिवसात वेतन जमा केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात वेतन जमा होण्याची तारीख (दि.१४) उजाडून देखील वेतन जमा न झाल्याने गुरुवारी पुन्हा संप केल्याने सिटीलिंक बसला ब्रेक लागला.
गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदार सिटीलिंक बसच्या वाहकांना वेळेत वेतन देत नसल्याने वाहकांना वारंवार नाइलाजाने संप पुकारण्याची वेळ येत आहे, तर सिटीलिंक बससेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गाला सहन करावा लागत आहे. जोपर्यंत वाहकांना पेमेंट मिळत नाही तोपर्यंत डेपोतून बस बाहेर काढणार नाही, असाच पवित्रा वाहकांनी घेतल्याने गुरुवारी दुपारपर्यंत डेपोत बस थांबूनच होत्या, थकलेले वेतन मिळावे यासाठी वाहकांनी सकाळपासूनच बस डेपोत ठिय्या मांडलेला होता.