नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील चिंचोळ्या रस्त्यांवरून बेफाम वेगाने धावणाऱ्या सिटी लिंक बसविरोधात महापालिकेने ठोस भूमिका घेतली असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरी हद्दीत प्रतितास ६० किलोमीटर तर ग्रामीण भागात प्रतितास ९० किलोमीटर वेगाची मर्यादा यापुढे सिटी लिंकच्या चालकांना पाळावी लागणार आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेचे भरारी पथक कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप चौधरी यांनी दिली.
८ जुलै २०२१ पासून शहरात सिटी लिंक सुरू आहे. सध्या ५६ मार्गांवर २४४ बसेसची सुविधा प्रवाशांना पुरविण्यात येते. गेल्या काही दिवसांमध्ये शहर व ग्रामीण भागामध्ये वेगाने सिटी लिंकच्या बसेस धावत असल्याच्या तक्रारी येत होत्या. शहरात आधीच चिंचोळे रस्ते असून त्यामध्ये वेगाने धावणाऱ्या सिटी बस लिंकमुळे लहान वाहनांना अपघात होत असल्याच्याही तक्रारी होत्या. दुसरीकडे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे फेऱ्यांची मर्यादा पूर्ण करता येत नसल्यामुळे काही ठिकाणी जास्त वेगाने बसेस धावत असल्याची ठेकेदाराची बाजू आहे. मात्र केंद्र शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वेगमर्यादा निश्चित केली असून त्यासंदर्भात ६ जानेवारी रोजी पाठविलेल्या पत्राचा आधार घेऊन नवीन निर्देश जारी करण्यात आले आहे.
या भागात ताशी ९० किमीपर्यंत वेग:
सिटी लिंक नाशिक शहरासह लगतच्या २० कि.मी. च्या आत येणाऱ्या सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, मोहाडी, सुकेणा, सय्यदपिंप्री, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, सायखेडा या भागातही सेवा देते. येथे आता ९० किमी वेगमयदिसाठी परवानगी असणार आहे.
सिटी लिंकबाबत असलेल्या तक्रारी:
सिग्नल जम्पिंग करणे, मर्यादेपेक्षा अधिक वेगाने बस चालविणे, झेब्रा क्रॉसिंगचे नियम न पाळणे, स्पीडब्रेकरवर वेगाने बस चालविणे, थांब्याऐवजी रस्त्यावरच बस थांबविणे, ओव्हरटेक करण्यासाठी दोन बसेसमध्ये स्पर्धा करणे.