नाशिक। दि. १९ जानेवारी २०२६: नाशिक महानगरपालिकेमार्फत जुना गंगापूर नाका ते शरणपूर रोड पोलीस चौकीदरम्यान दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल जाहीर केले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसह गैरसोय टाळण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत टप्पा क्रमांक १ मध्ये शरणपूर पोलीस चौकी सिग्नल ते जुना गंगापूर नाका सिग्नलकडे जाणाऱ्या बाजूचे काम करण्यात येणार आहे. कामाच्या काळात सदर बाजूकडील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार असून, दुसऱ्या बाजूने हलक्या वाहनांसाठी (लाईट व्हेईकल) एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे.
टप्पा क्रमांक १ साठी वाहतूक बदल:
शरणपूर पोलीस चौकी ते जुना गंगापूर नाका सिग्नलच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग म्हणून शरणपूर पोलीस चौकी सिग्नलपुढे एबीबी सिग्नलवर उजवीकडे वळून महात्मानगर–जेहान सर्कल मार्गे गंगापूर रोडकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. या मार्गाचा वापर करून पंचवटी व परिसराकडे जाणाऱ्या वाहनांनी प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून कळविण्यात आले आहे. सदरची सूचना २० जानेवारी २०२६ ते १९ एप्रिल २०२६ पावेतो अमलात राहणार आहे.
![]()


