नाशिक (प्रतिनिधी): गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊन कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की घराची भिंत कोसळली. शिवाय घरापासून 10 ते 15 फूट अंतरावर असलेल्या वाहनाच्या काचाही फुटल्या.
नाशिकच्या खुटवडनगर परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास पगार कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. घरातील महिला लहान मुलासाठी दुध गरम करण्यासाठी स्वयंपाकखोलीत गेली, आणि लाईटरने गॅस पेटवायचा प्रयत्न केला असता हा स्फोट झाला. या स्फोटात कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट एवढा भीषण होता की घराचं संपूर्ण नुकसान तर झालंच आहे, पण तडे जाऊन घराची भिंतही कोसळली आहे. तसंच घरापासून 10 ते 15 फूट अंतरावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं आहे.