नाशिक। दि. ८ एप्रिल २०२६: नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यांची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आली आहे.
यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खाजगी अस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास त्यांनी CP WhatsApp क्रमांक 9923323311 वर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक ११२ वर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात. तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तींची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()

