नाशिक: खंडणी प्रकरणाला वेगळे वळण, फिर्यादीवरच अत्याचाराचा गुन्हा दाखल; १२१ आक्षेपार्ह व्हिडीओ

नाशिक। दि. ४ एप्रिल २०२६: सातपूर परिसरात अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करून चार जणांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून, खंडणीची तक्रार देणारा रवींद्र गणपत एरंडे (वय ६३, रा. अशोकनगर, सातपूर) याला लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या आरोपांखाली पोलिसांनी अटक केली आहे.

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडे याने सुरुवातीला आपल्याकडील खासगी व संवेदनशील अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची मागणी करण्यात आल्याची फिर्याद दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचत आकाश पुंडलिक बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज सुनील गवई आणि श्रीपत शिंदे यांना पैसे स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोपींकडून दोन पेन ड्राइव्ह, हार्डडिस्क आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

दरम्यान, तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. एरंडे याच्याकडील तब्बल १२१ आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून, त्यामध्ये विविध महिलांचे चित्रीकरण असल्याचे निष्पन्न झाले आहे. एरंडे याच्याकडे काम करणाऱ्या एका तरुणाने त्यांचा टॅब चोरून हा प्रकार उघडकीस आणल्याचे समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर वृक्षतोडीविरोधात आंदोलन; वृक्ष वाचविण्यासाठी पाच तासांचा संघर्ष

याच प्रकरणात एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एरंडेने तिच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत नाशिक व इगतपुरी परिसरातील हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केले. तसेच त्या संबंधांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून एरंडे यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  महावितरणचा आयपीओ येणार ; कृषी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी

या दुहेरी स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी एरंडे याच्या विरोधात आणखी कुणाकडे तक्रार असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

पीडितांनी येथे करावी तक्रार:
सचिन बारी, सहायक पोलिस आयुक्त: 9049872822
प्रकाश अहिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक: 9823234176
स्वप्नाली पलांडे, सहायक पोलिस निरीक्षक: 7774002710

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790