ब्रम्हगिरी परिसरातील इको सेन्सिटिव्ह झोनची सीमा निश्चित होणार
नाशिक (प्रतिनिधी): ब्रह्मगिरी हे नाशिक जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम असल्याने गोदावरी नदीचे पावित्र्य सुद्धा ब्रह्मगिरी पर्वत व त्या परिसरात होत असलेल्या विविध घडामोडींवर अवलंबून आहे. ही बाब विचारात घेता ब्रह्मगिरीची हिरवाई व गोदावरीचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने या परिसरापासून आपल्या जिल्ह्यातील इको सेन्सिटिव्ह झोन (परिसंवेदनशील क्षेत्र) ठरवण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुरू केली आहे.
दि 04 जून 2014 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात परि-संवेदनशील ( इको-सेन्सिटिव्ह झोन) क्षेत्राची सीमा ठरवण्यासाठी गावनिहाय समित्या व राज्यस्तरीय समिती गठन करण्यात आलेली आहे. या ग्रामस्तरीय समितीचे संबंधित ग्रामसेवक हे सदस्य सचिव आहेत. ही समिती प्रस्तावित परिसंवेदनशील क्षेत्राच्या संबंधात जनसुनावणी घेऊन परिसंवेदनशील क्षेत्राची प्रत्यक्ष तपासणी करून त्याचे चिन्हांकन करेल आणि त्याचा नकाशा तयार करेल अशी तरतूद या शासन निर्णयात आहे.
प्रत्यक्ष तपासणीच्या आधारे तयार केलेल्या अहवालाचा अभ्यास करून नैसर्गिक जैवविविधतेने समृद्ध भूक्षेत्र , मानवनिर्मित भुवापर , वनक्षेत्र, तलाव, नदी, नाले गुऱचराई क्षेत्र विचारात घेऊन परि-संवेदनक्षेत्राचे आलेखन करेल अशी तरतूद आहे, त्या अनुषंगाने ब्रम्हगिरी व परिसरात कार्यवाही करण्यात येणार आहे.
या समितीचे सदस्य सचिव ग्रामसेवक असल्याने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कार्यवाही सुरू करणेबाबत कळविणेत आले असून वनविभाग, कृषी विभाग या खात्यांसह उपविभागीय अधिकारी (महसूल) नाशिक, त्र्यंबकेश्वर यांनाही या समिती संबंधी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी नमूद केले आहे.