नाशिक। दि. ०३ ऑगस्ट २०२५: बळी मंदिरातील पारायणास जाणाऱ्या वृद्ध महिलेला आयशरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (दि. २) दुपारी २ वाजता बळी महाराज मंदिर चौफुलीवर हा अपघात झाला. आयशरचालक फरार झाला असून पंचवटी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि संगिता गायकवाड (रा. हनुमान नगर, अमृतधाम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी २ वाजता त्यांची आई राधाबाई गायकवाड (वय ७०) या बळी महाराज मंदिरात पारायणासाठी जात होत्या. चौफुलीवर रासबिहारी लिंक रोडकडून भरधाव आलेल्या आयशरने (एमएच ०४ एल.क्यु ९७१३) त्यांना चिरडल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर चालकाने आयशर सोडून पलायन केले. पंचवटी पोलिसांनी मृतदेह सिव्हिलमध्ये पाठवला. संशयित चालकाविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रावणानिमित्त बळी मंदिरात राधाबाई ह्या बराच वेळ ध्यानधारणा करत असत. उपस्थित भाविक-भक्तांशी त्यांचा परिचय झाला होता. पारायणाला येणाऱ्या राधाबाईंवर शनिवारी काळाने घाला घातल्याने मंदिरातील भाविकांमध्ये तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३७६/२०२५)