नाशिक। दि. २२ जुलै २०२५: गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे. कोकण किनारपट्टीसह पुणे सांगली, सातारा व मराठवाड्यातीलही बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातही जोरधारा सुरूच आहेत. दरम्यान अरबी समुद्रावर पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्याने पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात पावसाची चांगली हजेरी राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. तळ कोकणासह मुंबई व उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भ मराठवाड्यातही पावसाचे हाय अलर्ट देण्यात आले आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे उपसागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. दरम्यान अरबी समुद्रावरही जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्या असून कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी विदर्भ मराठवाड्यातील काही भागांना पावसाचे तीव्र इशारे देण्यात आलेत. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची उसंत राहील. मात्र घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे कोणते अलर्ट?
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज 22 जुलै रोजी हवामानाचा अलर्ट जारी केला आहे. यानुसार मुंबई व उपनगरासह ठाणे ,पालघर तसेच संपूर्ण कोकणपट्टीला पाऊस झोडपणार आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाड्यात धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांना पावसाचे यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
👉 22 जुलै: ऑरेंज अलर्ट -रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सातारा कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट :मुंबई, ठाणे, पालघर,पुणे घाटमाथा,धाराशिव, लातूर, नांदेड,अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली
👉 23 जुलै : ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर -सातारा -पुणे घाटमाथा
यलो अलर्ट- मुंबई, ठाणे, पालघर,नाशिक घाटमाथा,यवतमाळ ,चंद्रपूर, गडचिरोली
👉 24 जुलै : ऑरेंज अलर्ट – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,पुणे -सातारा – कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट – मुंबई, पालघर, नाशिक घाटमाथासह वाशिम ,बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा
👉 25 जुलैः ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,भंडारा, पुणे – सातारा – कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट : मुंबई ,ठाणे, संपूर्ण विदर्भ,हिंगोली नांदेड
पुढील चार दिवस कसे राहणार हवामान?
राज्यात पुढील चार दिवस मुंबई उपनगरासह संपूर्ण कोकणपट्टी तसेच घाट माथ्यावर पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे .