नाशिक / पुणे। दि. २८ ऑक्टोबर २०२५: राज्यात मे महिन्याच्या प्रारंभी सुरू झालेल्या पावसाचा मुक्काम ऑक्टोबरचा शेवट जवळ आला तरी कायम असल्याचे चित्र आहे. सोमवारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, जळगाव, अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झाला. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान वाढल्यामुळे तयार झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हा पाऊस होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, महाराष्ट्रात ३० ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवार रात्री मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम ते कलिंगापट्टणम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर इतका असू शकतो.
दरम्यान, नाशिक, जळगाव, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी पुढील ७२ तास ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
![]()

