राज्यात उष्णतेची लाट तीव्र; अकोला सर्वाधिक ४३.१ तर नाशिक ३९.५ अंश सेल्सिअस

नाशिक। दि. १३ एप्रिल २०२६: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. अकोला येथे ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. सोलापूर ४१.६ अंशांसह दुसऱ्या क्रमांकावर असून गेल्या तीन दिवसांत तेथील तापमानात तब्बल ३.५ अंशांची वाढ झाली आहे. विदर्भातही उष्णतेचा तडाखा कायम असून अमरावती येथे ४२.४ तर वर्धा येथे ४२ अंश तापमान नोंदले गेले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस):
अकोला: ४३.१०
अमरावती: ४२.४०
वर्धा: ४२.००
सोलापूर: ४१.६०
नागपूर: ४१.४०
नाशिक: ३९.५

दरम्यान, नाशिकमध्येही यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३९.५ अंश तापमान रविवारी (दि. १२) नोंदविण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे शहरातील जनजीवनावर परिणाम जाणवत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता आणि दमटपणा वाढल्याने दिवस-रात्र उकाड्याची तीव्रता जाणवत आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

रविवारी नाशिकमध्ये किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसांपासून हवामान कोरडे असल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पुढील काही दिवसांत तापमान ४३ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून राज्यासाठी दमट व उष्ण हवामानाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790