मुंबई। दि. २४ नोव्हेंबर २०२५: उत्तरेकडील शीत वाऱ्यांचा प्रवाह मंदावला असून राज्यातील कडाक्याची थंडी ओसरली आहे. तसेच पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज असून, राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
काल म्हणजेच रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी १०.१ अंश तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर गेल्याने थंडी कमी झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला असून, उकाडा जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार असून, रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले असून राज्यात आकाश ढगाळ होत आहे. आज राज्यात थंडी कमी होणार असून, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ आकाश, विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी होणार आहे.
दरम्यान वातावरणात होणारा बदल पाहता त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकल्यासारख्या आजारांना बदलत्या हवामानाने आमंत्रण दिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय पुढे काही दिवस वातावरण असेच राहणार असल्याचे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. ऐन हिवाळ्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
![]()


