नाशिक (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाकडून 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा तपशीलवार कार्यक्रम घोषित केल्याप्रमाणे 22 ते 29 ऑक्टोबर 2024 हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी होता.
उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारी तसेच चिन्ह वाटप:
विहीत कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 359 उमेदवारांनी 506 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यावर 337 उमेदवार निवड़णूकीच्या लढतीत होते. 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपावेतो उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस होता.
4 नोव्हेंबर रोजी माघारीची वेळ समाप्त झाल्यावर निवडणूक लढविणा-या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवड़णूकीसाठी चिन्ह वाटप प्रक्रीया पुर्ण केली. आयोगाच्या निर्देशानुसार चिन्हांचे वाटप उमेदवारांना त्यांचे / उमेदवार प्रतिनिधी यांचे उपस्थितीत करणेत आले. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार तसेच नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार ) यांचेसाठी आयोगाकडून राखीव ठेवणेत आलेले / निश्चित करून दिलेले चिन्ह देणेत आले तर अपक्ष उमेदवारांना त्यांनी नामनिर्देशनपत्रात नमुद केल्याप्रमाणे तीन पसंतीक्रमाच्या चिन्हांनुसार चिन्ह देणेत आले.
04 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात 141 उमेदवारांनी माघार घेतल्यावर 196 उमेदवार निवड़णूक लढवित आहेत. नांदगाव: १४, मालेगाव (मध्य): १३, मालेगाव (बाह्य): १७, बागलाण (अ.ज.): १७, कळवण (अ.ज.): ७, चांदवड: १४, येवला: १३, सिन्नर: १२, निफाड: ९, दिंडोरी (अ.ज.): १३, नाशिक (पूर्व): १३, नाशिक (मध्य): १०, नाशिक (पश्चिम): १५, देवळाली (अ.ज.): १२, इगतपुरी (अ.ज.): १७.
निवडणूक लढविणारे राष्ट्रीयपक्ष / राज्यस्तरीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार:
जिल्ह्यात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार 47 तर नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार ( राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार ) – 52 आणि अपक्ष – 97 असे एकूण 196 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
जिल्ह्यात सर्वात जास्त आणि कमी उमेदवार असलेले मतदारसंघ:
जिल्ह्यात सर्वात जास्त प्रत्येकी 17 उमेदवार 115-मालेगाव बाह्य, 116-बागलाण आणि 127-इगतपुरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात आहेत तर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच सात उमेदवार 117-कळवण (अ.ज.) मतदारसंघात आहेत त्यानंतर 121-निफाड मतदारसंघात 9 उमेदवार आहेत.
मतदान यंत्रावर म्हणजेच एका बॅलट युनिटवर एकूण 16 उमेदवारांना मतदान करता येईल अशी रचना असते. त्यानुसारच मतपत्रिका तयार करणेत येते. निवडणूक लढविणा-या उमेदवारांनंतर मतपत्रिकेवर सर्वात शेवटी वरीलपैकी कोणीही नाही (NOTA) चे चिन्ह असते. ज्या ठिकाणी 15 उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्या ठिकाणी 15 उमेदवार आणि 16 व्या क्रमांकावर नोटा अशी मतपत्रिकेची रचना असते. जिल्ह्यात अशी स्थिती 125-नाशिक पश्चिम मतदारसंघात आहे.
नाशिक जिल्ह्यात 3 मतदारसंघात 115-मालेगाव बाह्य, 116-बागलाण आणि 127-इगतपुरी (अ.ज.) या मतदारसंघात मतपत्रिकेवर एकूण 17 उमेदवार + 1 NOTA अशी रचना लक्षात घेता दोन मतदानयंत्र (BU- बॅलट युनिट) लागणार आहेत. उर्वरित 12 मतदारसंघात मात्र एकच मतदान यंत्र (BU- बॅलट युनिट) लागणार आहे.
जिल्ह्यात आवश्यक मतदानयंत्रांची उपलब्धता:
नाशिक जिल्ह्यात 4922 मतदान केंद्र असुन यासाठी आयोगाच्या मानकानुसार 120 % बॅलट युनिट आणि तेवढेच कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत. तर 130 % व्हीव्हीपॅट यंत्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्र संख्येनुसार 10882 बीयु आणि 6247 सीयु तसेच 6739 व्हीव्हीपॅट मतदानासाठी प्रथम स्तरीय तपासणी (First Level Checking FLC) करून मतदानासाठी तयार करणेत आली आहेत.
या सर्व मतदानयंत्रांची प्रथमस्तरीय तपासणीआयोगाच्या निर्देशानुसार भारत इलेक्ट्रॅानिक्स लिमिटेड ( BEL ) च्या अभियंत्यांकडून राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत पुर्ण झाल्यावर प्रथम सरमिसळ ( First Randmisation) करून ही यंत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे ताब्यात देणेत आली आहेत. ही यंत्रे विधानसभा मतदारसंघाचे ठिकाणी तयार करणेत आलेल्या विशेष सुरक्षा कक्षात अहोरात्र पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कव्हरेज मध्ये ठेवणेत आली आहेत.
दोन मतदान यंत्र लागणा-या विधानसभा मतदारसंघांसाठी अतिरिक्त बीयुचे वाटप:
दि. 19.10.2024 रोजी प्रथम सरमिसळ झाल्यावर 5899 बॅलट आणि कंट्रोल युनिट आणि 6391 व्हीव्हीपॅट यंत्रे विधानसभा मतदारसंघाकडे सोपविणेत आली.
आता दि. 04 नोव्हेंबर रोजी माघारीनंतर ज्या ठिकाणी दोन मतदानयंत्रांची आवश्यकता आहे असे 115-मालेगाव बाह्य, 116-बागलाण आणि 127-इगतपुरी (अ.ज.) मतदारसंघांसाठी अतिरिक्त बॅलट युनिट देणेकामी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक निरिक्षक यांचे उपस्थितीत दि. 05 नोव्हेंबर 2024 रोजी पुरवणी सरमिसळ (SupplementaryRandomisation) करणेत येऊन या मतदारसंघांना आवश्यक मतदान यंत्रे पुरविणेत येत आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांकडे आवश्यक संख्येइतकी मतदान यंत्रे उपलब्ध आहेत.
मतपत्रिका प्राप्त झाल्यावर मतदान यंत्रांचे कमिशनिंग प्रक्रीया:
मतपत्रिका प्राप्त झाल्यावर विधानसभा मतदारसंघ स्तरावर उमेदवारांचे उपस्थितीत मतदान यंत्रांचे कमिशनिंग प्रक्रीया पुर्ण करणेत येईल. कमिशनिंग झाल्यावर मतदान यंत्रे पुन्हा विशेष सुरक्षा कक्षात उमेदवारांचे उपस्थितीत अहोरात्र पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कव्हरेज मध्ये ठेवणेत येतील. मतदानाचे एक दिवस आधी मा. निवडणूक निरिक्षक आणि उमेदवारांचे उपस्थितीत विशेष सुरक्षा कक्ष उघडून मतदान यंत्रे मतदान पथकांच्या ताब्यात देऊन त्यांना मतदान केंद्रावर रवाना करणेत येईल.
जिल्ह्यातील एकूण मतदार:
जिल्ह्यात दि. 19.10.2024 रोजी मतदार नोंदणीसाठीच्या अंतिम मुदतीनंतर जिल्ह्यात 26,14,096 पुरुष मतदार 24,46,968 स्त्री मतदार आणि 121 इतर या प्रमाणे 50,61,185 मतदार आहेत. तसेच 8,796 सैनिक मतदार देखील ETPB ( Electronically Transmitted Postal Ballot ) प्रणालीद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावतील.