मुंबई (प्रतिनिधी): ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज पाच दिवस बंद राहण्याबाबतची पूर्वसूचना राज्यातील आपले सरकार सुविधा केंद्रांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आपले सरकार पोर्टलवरून प्रदान केल्या जातात. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी हे पोर्टल विकसित केले असून, या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अपडेटसाठी १० एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत असे पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना महसूल, शैक्षणिक प्रमाणपत्र काढण्यासह इतरही सुविधांचा लाभघेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
आगामी शेती, शैक्षणिक हंगाम बघता संकेतस्थळ धीम्या गतीने चालू नये, त्यामुळे आपले सरकार केंद्रातून सर्वसामान्यांना देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी ५ दिवस संकेतस्थळ बंद करून त्यावर काम केले जाणार आहे, अशी माहिती महाऑनलाइन नागरी सेवाप्रमुख राहुल सुर्वे यांनी दिली.