मान्सूनचं आगमन जवळ: केरळमध्ये दोन दिवसांत तर मुंबईत 1 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता

पुणे, 23 मे 2025: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून केरळमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्राच्या मध्य व पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आगामी तीन ते चार दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यातील मुसळधार पावसाने घेतली विश्रांती; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावरही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे.

👉 हे ही वाचा:  जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू - कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

मान्सूनच्या आगमनासाठी दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक व तमिळनाडूच्या काही भागांतील हवामान पोषक बनले आहे. याशिवाय, बंगालच्या उपसागरातील दक्षिण-मध्य व उत्तर भाग आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही मान्सून पुढे सरकण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत साधारण १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज:
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळमध्ये २५ मेपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर मुंबईत साधारण १ जूनच्या आसपास मान्सूनचं आगमन होईल. मात्र, मुंबईसाठी सध्या ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करीत हरित कुंभसाठी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

दरम्यान, कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे २३ मेच्या संध्याकाळपर्यंत अधिक तीव्र होऊन अवदाबात रूपांतरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790