
नाशिक, दि. २३ मे २०२५: सातपूरच्या पपया नर्सरीजवळील सौभाग्य मंगल कार्यालयात सुरु असलेल्या लग्नसमारंभादरम्यान वधूपक्षाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून फरार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तब्बल ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ ने ही कामगिरी केली आहे.

दि. २० मे २०२५ रोजी सौभाग्य मंगल कार्यालय (पपया नर्सरी, सातपूर) येथे लग्नकार्य सुरु असताना एक अनोळखी इसम मोपेडवर येत थेट वधूपक्षाच्या खोलीत घुसून दागिने चोरून पळून गेला होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयित व्यक्ती मोपेडवर येताना आणि दागिने चोरून जाताना स्पष्ट दिसून आला. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, हवालदार सुनिल आहेर, प्रकाश महाजन आणि अंमलदार तेजस मते यांच्या टीमने तब्बल ४५ सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली.
संशयित आरोपी हा स्वारबाबानगर मार्गावर, आयटीआयच्या मागे, भिंतीलगत मोपेडवर येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराच्या मार्फत मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत संशयितास अटक केली.
अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव प्रशांत देवानंद राणे (वय ३४), रा. ओम कॉलनी, जुने धुळे, ह.मु. सातपूर, नाशिक असे आहे. पंचासमक्ष तपासणी दरम्यान त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोपेड (क्र. MH15 GT 9597) असा एकूण ३,७८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित प्रशांत राणे याच्यावर सातपूर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून, पुढील तपासासाठी त्यास सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळु शेळके, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार, पोलीस हवालदार संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण,मनोहर शिंदे, पोअं/तेजस मते, प्रविण वानखेडे, सुनिल खैरनार, जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने केली असुन तांत्रिक विश्लेषण कडील सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांचे टिम यांचे सहकार्य लाभले.