पुणे । ५ मे २०२५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ५) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्य मंडळ यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करणार असून हा एक नवा विक्रमच आहे. तसेच, यंदा पहिल्यांदा डिजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध केली आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संबंधित संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील आणि त्याच्या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल ‘https://mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल.
गुणपडताळणीसाठी अर्ज:
ऑनलाइन निकालानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ‘https://mahahsscboard.in’ या संकेतस्थळावरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ ते २० मे पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
पुनर्मूल्यांकनासाठी काय करावे ?:
👉 बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
👉 छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून दिलेल्या नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
👉 ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
श्रेणी/गुणसुधार योजना:
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील. जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ७ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी म्हटले आहे.बारावीच्या निकालासाठी संकेतस्थळ- https://results.digilocker.gov.in- https://mahahsscboard.in- http://hscresult.mkcl.org.