नाशिक: झडप घालणाऱ्या बिबट्यावर डबा फेकून ९ वर्षीय मुलाने स्वतःला वाचविले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): बिबट्याने ९ वर्षीय शाळकरी मुलावर हल्ला केला. मात्र घाबरून न जाता या मुलाने हिंमत दाखवत पाण्याने भरलेला डबा बिबट्याला मारून फेकल्याने गडबडलेल्या बिबट्याने पलायन केल्याने या बालकाचा जीव वाचला. पिंपळगाव खांब येथे घडलेल्या या घटनेत जखमी झालेल्या या मुलावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पिंपळगाव खांब येथील रहिवासी सोमनाथ चारसकर व आरती चारसकर या शेत मजूर दांपत्याचा मुलगा अभिषेक (९) हा पिंपळगाव खांब येथील जि. प. शाळेत इयत्ता चौथीत शिकत आहे.

रविवारी दुपारी ३ च्या सुमारास तो शौचास गेला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. मात्र, त्याने घाबरून न जाता आपल्या जवळील पाण्याने भरलेला डबा बिबट्याच्या तोंडावर मारला आणि आरडाओरड केली.

पाण्याच्या डब्याचा फटका तोंडावर बसल्याने बिबट्याने पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात अभिषेकच्या पाश्वभागाला गंभीर जखम झाली. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक जगदीश पवार व ग्रामस्थ यांनी अभिषेकला बिटको रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. वन अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790