मुंबई (प्रतिनिधी): महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहिण योजनेची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. महिलांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा झाला असला तरी 2100 रुपयांचा हप्ता केव्हापासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच लाडकी बहिण योजनेच्या निकषांची चर्चा सुरु झाली आहे. या योजनेचे निकष बदलणार अशी चर्चा सुरु असते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे.
काल मंत्री आदिती तटकरे यांनी रायगडमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ‘राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे. या सरकारने एकही निकष बदललेला नाही. पुढेही या योजनेचे निकष बदलले जाणार नाहीत’
‘चालू वर्षात दोन कोटी एक्केचाळीस लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. या लाडक्या बहिणी स्वत:हून पुढे येऊन प्रगतीबाबत सांगत आहेत. तसेच अनेक महिलांना स्वत: लाभ नको म्हणून सांगितले आहे. पण विरोधकांना या योजनेमुळे धडकी भरली असून ते योजनेबाबत चुकीचा प्रचार करत आहेत, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
गोगावलेंना टोला:
पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. ज्याची त्याला जबाबदारी मिळेल, पदाची इच्छा व्यक्त करणे काही गैर नाही. मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था देखील चांगली कशी राहील, याचे भान जपले पाहिजे. एक मंत्री म्हणूनही जबाबदारी आहे, असा खोचक टोला आदिती तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना नाव न घेता लगावला.
![]()


