कुंभमेळा २०२७: भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक। दि. ८ जानेवारी २०२६: पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

कुंभमेळा प्राधिकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सोयीसुविधा तयार करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करीत अहवाल सादर करावेत. त्यामुळे पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल. भूसंपादनासाठी संबंधित जमीन मालकांशी संवाद साधावा. त्यांना भूसंपादनाची प्रक्रिया आणि मोबदला याविषयी सविस्तर माहिती द्यावी, असेही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती देऊन पुढील टप्प्यात करण्यात येणा-या कामांबाबत कुभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती दिली. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त श्रीमती खत्री यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी नवीन घाट, रस्ता तयार करणे आदी विविध कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले. यावेळी सर्व संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती बैठकीत दिली.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

या बैठकीला प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता (इगतपुरी), अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. शशिकांत मंगरुळे (निफाड) उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, रवींद्र भारदे, महेश जमदाडे (भूसंपादन), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790