बाई असल्याचं भासवून लग्न, आणि मग फुटलं बिंग, जिच्यासोबत सात फेरे घेतले, ती निघाली…

फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांशी चॅटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात दोघांनी विधिवत लग्न केले. परंतू तिची तब्येत बरी नसल्याने तरुणाच्या आईने जवळच्या दवाखान्यात नेले. तिथे नववधूचे बिंग फुटलं आणि सर्वांना जबर धक्का बसला.

फेसबुकवर ओळख निर्माण करुन एका तृतीयपंथीयाने तरुणी असल्याचे भासवले. त्यानंतर तरुणाशी लग्न करुन त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण जिच्यासोबत लग्न केलं ती महिला नाही, तर तृतीयपंथीय असल्याचे समोर आल्यानंतर तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली.

तरुणाने न्यायालयात धाव घेत तक्रार केल्यावर या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार तरुणाची फसवणूक करणाऱ्या तृतीयपंथीवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, जळगाव शहरातील गिरणा पंपीगरोड परिसरात संबंधित २६ वर्षीय तरूण वास्तव्याला आहे. त्याच्या घरात आई, लहान भाऊ असून तो खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले आहे.

तरुणाला फेसबुक अकाउंटवर १४ एप्रिल रोजी दिव्या पाटील नावाच्या तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. चेतनने ती स्वीकारली. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू झाले. एकमेकांच्या परिवाराविषयी त्यांनी माहिती घेतली. यात दिव्या नावाच्या संबंधित तरुणीने, माझे आई-वडील वारले असून मी खोटे नगरला एकटीच राहते, शेअर मार्केटच्या व्यवसायातून पैसे कमावते, तसेच जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे लॅबला कामाला असल्याचे तरुणाला सांगितलं. याच ओळखीचा फायदा घेत तरुणीने तरुणासोबत लग्न करण्याचा तगादा लावला.

तरुणाच्या वाढदिवशी मंदिरात साध्या पद्धतीने विवाह:
त्यानुसार तरुणाने ही बाब त्याच्या नातेवाईकांना कळविली, नातेवाईकांनी दोघांना बोलावून घेतले. याठिकाणी तरुणी दिव्या हिने तरुणाला त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २९ एप्रिलला लग्न करायचे असल्याचे सांगितले. तरुणीला तिचे नातेवाईक कोणी येऊ शकेल का? असे विचारण्यात आले. तेव्हा मामा-मामी आहेत. पण ते येऊ शकणार नाही असे दिव्या पाटील हिने सांगितले. जास्त लोकांना बोलावू नका. मोठा सोहळा करू नका असे तिने सांगितले.

त्यानंतर २९ एप्रिल रोजी तरुणाचा आणि तरुणी दिव्या यांचा धार्मिक पद्धतीने गिरणा पंपिंग रोड मधील नगरातच विवाह पार पडला. विवाहानंतर २९ एप्रिल ते ८ मे च्या दरम्यान दिव्या पाटील ‘पत्नीधर्म’ निभावण्यात कसूर करु लागली. तसेच पती असलेल्या तरुण व त्याच्या कुटुंबीयांशी गैरवर्तन करू लागली. शिवीगाळ करत भांडण करु लागली. त्यामुळे तरुण आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा त्रास होत होता.

असं फुटलं तरुणी तृतीयपंथीय असल्याचं बिंग:
८ मे रोजी तरुणीला तिची तब्येत बरी नसल्याने तरुणाच्या आईने जवळच्या दवाखान्यात नेले. याठिकाणीही तरुणीने डॉक्टरांना तपासणी करू देण्यास नकार दिला व टाळाटाळ करीत तिथून निघून गेली. यावेळी डॉक्टरांना शंका आली , त्यांनी तरुणाच्या आईशी बोलतांना सांगितले की, तुमच्या सुनेचे वर्तन स्त्रीप्रमाणे वाटत नाही. ती तृतीयपंथी असल्यासारखी वाटत आहे. तुम्ही तपासून घ्या. त्यानंतर घरी आल्यानंतर तरुणाच्या आईने व मामीने तरुणीला विचारणा केल्यावर तरुणीने यावेळी पुन्हा जोरजोरात आरडाओरड करत गोंधळ घालण्यात सुरुवात केली. यावेळी तिने चक्क तिच्या अंगावरील कपडे सुद्धा काढून टाकले. त्या वेळेला तरुणी ही स्त्री नसून तृतीयपंथी असल्याचं बिंग फुटलं. यावेळी तरुणीचं वास्तव रुप समोर आल्यानंतर तरुण आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790