
नाशिक (प्रतिनिधी): प्रत्येक नागरिक हा ग्राहक आहे. त्यांचे हक्क मिळवून देत ते वृद्धिंगत करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी येथे केले.
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा मंदाकिनी भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश चौधरी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या कविता चव्हाण, प्रेरणा महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी पारधे म्हणाले की, ग्राहकांच्या हक्काबरोबरच प्रत्येकाने ग्राहक कर्तव्य जाणून घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभागाच्या माध्यमातून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ततेसाठी प्रयत्न केले जातील. याबरोबरच ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या समन्वयाने ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती भोसले म्हणाल्या की, ग्राहक हा ग्राहक हक्क संरक्षण कायद्याचा आत्मा आहे. ‘शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल’, अशी यंदाच्या ग्राहक हक्क दिनाची संकल्पना आहे. ग्राहक म्हणून कमीत कमी रसायनांचा समावेश असलेल्या वस्तूंचा वापर वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे शाश्वत जीवनशैलीचा विकास होऊ शकेल. आवश्यकतेनुसार वस्तूंची खरेदी केल्यास पर्यावरण संरक्षणास मदत होईल.
राष्ट्रीय ग्राहक परिषदेच्या सदस्या आशा पाटील, ग्राहक पंचायतीचे सदस्य दत्तात्रय शेळके, सचिव विलास देवरे, राजेंद्र जडे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा पुरवठा अधिकारी पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.