नाशिक (प्रतिनिधी): बलायदुरी जवळील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये वास्तव्य करणाऱ्या मुंबईच्या घाटकोपर व गोरेगाव येथील १० जणांवर इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १० संशयितांमध्ये महिलांचाही समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग, स्वतःसह इतरांना संसर्ग पसरण्यासाठी कारणीभूत ठरल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हाबंदीचा आदेश असताना ई-पास न काढता या १० संशयितांनी नाशिक जिल्ह्यात प्रवेश केला. विनापरवाना प्रवेश करून इगतपुरीजवळील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये वास्तव्य केल्याचे निदर्शनास आल्याने व कोरोना आजाराचा संसर्ग पसरविण्याचा संभव आहे, हे माहीत असताना त्यांनी ही कृती केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, अशा विविध प्रकरणी रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये सुधारणा होत नसल्याने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी हे रिसॉर्ट सील केले आहे.