नाशिक – (प्रतिनिधी) कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवर बरोबरीने जगाला भेडसावणाऱ्या ‘कोविड-१९’ विषाणूविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात मोर्चा सांभाळण्याची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली आहे. लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र कर्तव्य निभावणारे पोलिस केवळ नाशिककरच नव्हे तर मुक्या जनावरांचेही पालक झाल्याचे विविध घटनांमधून दिसून येत आहे. खाकी वर्दीत दडलेल्या माणूसकीचे नाशिककर कौतूक करत आहे.
‘कोविड-१९’ आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात शासन-प्रशासन, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलिस दल यांचा सहभाग नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. पोलिस दलाला तर कायदा-सुव्यवस्थेबरोबरच लॉकडाऊनची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे दुहेरी आव्हान पेलावे लागत आहे. अशा आव्हानात्मक काळातही पोलिसांमधील माणूसकीचे दर्शन घडताना दिसते. शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य असल्याने मुक्या जनावरांना अन्न-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाथर्डी फाट्यावर कर्तव्य निभावणारा वाहतूक पोलिस भटक्या श्वानांना पाणी पाजतानाचा व्हिडिओ ‘नाशिक कॉलिंग’ ने प्रसारीत केला होता. याच मालिकेतील दुसरा व्हिडिओही ‘नाशिक कॉलिंग’ च्या हाती लागला आहे. पर्यटकांसाठी बनवण्यात आलेल्या पथकाला सध्या गस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागात वाहनातून गस्त घालताना हवालदार मंगेश शिंदे व चालक प्रशांत पाटील यांना मुक्या जनावरांना विशेषतः भटक्या श्वानांना लॉकडाऊनमुळे अन्न-पाणी मिळत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता दररोज कर्तव्यावर निघताना ते वाहनात या श्वानांसाठी बिस्कीट पुडे आवर्जून घेतात. तसेच शहरात अन्न वाटप करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना विनंती करून त्यांच्याकडून चपात्या घेतात. गस्त घालताना कर्तव्याबरोबरच दिसेल तिथे श्वानांना हे कर्मचारी बिस्कीट तसेच चपाती खाऊ घालून त्यांची क्षुधाशांती करत आहे. पोलिसांच्या या भुमिकेमुळे दलाची सर्वसामान्यांमधील प्रतिमा अधिक उजळली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790