नाशिक(प्रतिनिधी): भद्रकाली परिसरात शनिवारी (दि. 25 एप्रिल 2020) सकाळी लागलेल्या भीषण आगीत जवळपास 100 ते 150 घरे भस्मसात झाल्याची शक्यता आहे. भद्रकाली परिसरातील भिमवाडी सहकार नगर परिसत ही आग लागली. आगीची माहिती मिळताच शहरातील अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. लॉकडाऊन मुळे ठिकठिकाणी बेरीकेड्स होते त्यामुळे बंब दाखल होण्यास अडचण निर्माण झाली होती.
आग इतकी भीषण होती की त्यात शेकडो घरे जाळून खाक झाल्याची शक्यता आहे. या परिसरात भरलेल्या सिलेंडरमधील गँस दुसऱ्या रिकाम्या टाकीत भरण्याचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशातच हा परिसर अतिशय दाट लोकवस्तीचा आहे. गल्ल्या अरुंद आहेत. ही आग लागली तेव्हा घरातील जवळपास सातपेक्षाही अधिक सिलेंडर्सचा स्फोट झाला आणि आगीने रुद्र रूप धारण केले. या परिसरातल्या अरुंद रस्त्यांमधून मार्ग काढत अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. ज्यांची घरे भस्मसात झाली आहेत, ते अक्षरश: बेघर झाले आहेत. अशांची व्यवस्था भालेकर मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाचे जवानही जखमी
आग विझवितांना अग्निशमन दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत. हे जवान घराच्या भिंतींवर उभे राहून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. सिडको अग्निशमन केंद्रातले जवान जगदीश देशमुख हे यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर इतर जवानांना घराचे पत्रे लागल्यामुळे किरकोळ जखमी झाले आहेत.