नाशिक(प्रतिनिधी): मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला व द्राक्षे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतातून थेट ग्राहकांच्या दारातपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम यापूर्वीही सुरू होता. परंतु मोठ्या प्रमाणात याची सुरुवात नाशिकमधून होत आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला असून, द्राक्षाचे भाजीपाल्याचे दर हे पडलेले आहेत. अशा परिस्थितीत २० मेट्रीक टन द्राक्षे, भाजीपाल्याच्या तीन गाड्या मुंबईला विक्रीसाठी पाठवून कृषि विभागाने शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देण्यात खारीचा वाटा उचलला आहे, असे मत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी (दि. 24 एप्रिल 2020) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात २० मे. टन द्राक्षे व भाजीपाला थेट मुंबईच्या ग्राहकांसाठी रवाना आला, त्यावेळी कृषिमंत्री दादा भुसे बोलत होते. भुसे म्हणाले, १४०० हेक्टर क्षेत्रावरील २८ हजार मे. टन द्राक्षे शिल्लक होती त्यापैकी २० मेट्रीक टन द्राक्षे पाठविण्यात येत आहेत. आज सात वाहने द्राक्ष व तीन वाहने भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यसाठी समन्वयाचे काम कृषी विभाग करत आहे. तर मागील काळात कोकणातील आंब्याला मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नव्हता, अशावेळी कृषी विभागाने मध्यस्थी करून हा आंबा मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्याचे कामही केले. त्यामुळे आज आब्यांला चांगले दर मिळत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाचा सामना करीत असतांना कृषी विभागाच्या माध्यमातून गावपातळीवर सुद्धा या शेतकऱ्याला स्वत: चा माल थेट बाजारपेठेत, छोटी गावे व मोठ्या शहरामध्ये विक्री करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
कृषिमंत्री दादा भुसे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, शेतकरी अडचणीत असून, त्याच्या पाठीमागे खंबीर उभे रहा. शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे विकत घ्या. ज्यांची परिस्थिती नसेल अशांना सेवाभाव वृत्तीतून खरेदी करून मोफत द्या.
शेतमाल विक्रीची साखळी तयार व्हावी
भविष्यात शेतकरी ते ग्राहक यांची शेतमाल विक्रीची साखळी तयार व्हावी शेतकऱ्यांच्या शेतमालास रास्त भाव मिळावा व शहरातील ग्राहकांनाही योग्य दरात मिळावा, या उद्देशाने ही संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी कृषी विभाग नेहमीच अग्रेसर राहणार असल्याचेही श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.