नाशिक (प्रतिनिधी): अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी जोरदार आगमन झाले. या पावसामुळे अंबड एमआयडीसीतील चार कारखाने जलमय झाले. इतर कारखान्यातही पाणी शिरले. तसेच वीजपुरवठा खंडीत झाल्याने लघुउद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नैसर्गिक नाल्याचा जीव घोटल्यामुळे पावसाचे पाणी आता थेट कारखान्यांमध्ये शिरत असल्याने उद्योजकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने गणेश मंडळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली तसेच गणेश दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या आनंदावर विरजण पडले.
रहीवाशी भागातील अनेक नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम केल्यने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असून घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याच्या घटना नेहमी घडतात. आता मात्र औद्योगिक वसाहतीतील नैसर्गिक नाल्यांचाही जीव घोटला जात असल्याने अंबड एमआयडीसीतील एक ‘नो डेव्हलपमेंट प्लॉट’ एका उद्योेजकाने प्रयत्न करून मिळवला आहे.
या प्लॉटमधून नैसर्गिक नाला गेलेला आहे. मात्र संबंधिताने पाईप टाकून नाल्याचा जीव घोटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्लॉट नंबर एफ ९ वरील डायनामिक को. ऑप सोसायटीतील गाळा नं. ७ मधील रेणूका एन्टरप्राईजेस, गाळा ८ मधील स्काय इंजिनिअरींग व गाळा नं. ९ मधील जय श्रीराम इंडस्ट्रीज या कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्या नैसर्गिक नाला पुन्हा पुर्ववत करून त्यास मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी मागणी उद्योजक अखिलेश प्रजापती, दीपक गुंजाळ व ए. एफ. खान यांनी केली आहे. अंबड एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये असे पाणी शिरले.
सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक, त्रिमूर्ती चौक परिसरात रात्री उशिरा जोरदार पाऊस सुरू होता. सिटी सेंटर मॉल चौकात रात्री ८.३० पासून सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली. तासभर अशी स्थिती होती. गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून रात्री ९ वाजता ३३१८ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. पावसामुळे शहर परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. पाथर्डी ते नासर्डी परिसरात तीन तास विजेचा लपंडाव सुरू होता.